
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांचा साखरपुडा येत्या २९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे. पार्थ पवार यांचा विवाह त्यांची मैत्रीण कायनात धार हिच्यासोबत होणार असून, पुण्यातील एका फार्महाऊसवर हा वाड्निश्चय सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात कायनात धार प्रथमच पवार कुटुंबासोबत सार्वजनिकरित्या दिसली होती. पारंपरिक वेशभूषेत पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत तिची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. आता तीच लवकरच पवार कुटुंबाची सून होणार आहे.
उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांचे बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्या घटनेनंतर अवघ्या सहा महिन्यांनी पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचा क्षण येत असून, पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. जय पवार यांचा विवाह, युगेंद्र पवार यांचा विवाह तसेच नुकताच पार पडलेला रेवती सुळे यांचा विवाह या सर्व प्रसंगी कुटुंबातील सदस्य एकत्र उपस्थित होते. त्यामुळे पार्थ पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यातही पवार कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु