जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 पैकी 13 संचालक बिनविरोध; उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 13 जागांवरील निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीनंतर बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित आठ जागांसाठीच निवडणूक होणार आहे. या प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ राजकीय
Q


परभणी, 11 जुलै (हिं.स.) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 13 जागांवरील निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीनंतर बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित आठ जागांसाठीच निवडणूक होणार आहे. या प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ राजकीय नेते, विद्यमान व माजी आमदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांची बिनविरोध निवड झाली असून काही मतदारसंघांमध्ये मात्र चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील 14 पैकी 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. परभणी गटातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश वरपुडकर, जिंतूर गटातून माजी अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर, सेलू गटातून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, पाथरी गटातून आमदार सईद खान यांचे बंधू मेहराज खान, गंगाखेड गटातून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, सोनपेठ गटातून आमदार राजेश विटेकर, पालम गटातून तुषार दुधाटे-गोळेगावकर, औंढा गटातून राजेश पाटील गोरेगावकर आणि सेनगाव गटातून रुपाली राजेश पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून माजी आमदार सुरेशराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. महिला मतदारसंघातील दोन्ही जागांवर प्रेरणा समशेर वरपुडकर आणि भावना सचिन बोर्डीकर-मुंगसे या बिनविरोध निवडून आल्या. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांचीही बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, काही मतदारसंघांमध्ये निवडणूक अटळ ठरली आहे. सोसायटी मतदारसंघातील पूर्णा, मानवत, वसमत, हिंगोली आणि कळमनुरी या गटांमध्ये मतदान होणार आहे.

इतर शेती संस्था मतदारसंघात आमदार सईद खान आणि विजय जामकर यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित असून अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात प्रशास ठाकूर आणि अतुल सरोदे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे. तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती व विविध मागास प्रवर्ग मतदारसंघात स्वराजसिंह परिहार, किरण मायंदळे आणि कुंडगीर यांच्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक जागांवरील निवडणुका बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांवरील लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande