
वर्धा 11 जुलै (हिं.स.)। मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे आणि जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील पावसाने मोठा दिलासा दिला आहे. सुरुवातीला रखडलेल्या पेरण्यांनी आता चांगलाच वेग घेतला असून, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८५ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.
यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरिपाच्या पेरण्या चांगल्याच खोळंबल्या होत्या. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होता. जून महिन्यात सरासरी १३२.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या ७५.९ टक्के एवढेच होते. मुख्य म्हणजे सुरुवातीचा काळ कोरडा गेल्याने पेरणीचा हंगाम लांबणीवर पडेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. जूनच्या तुलनेत जुलै महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली. जुलैमध्ये आतापर्यंत ८८.१ मि.मी. पाऊस झाला असून, ही टक्केवारी ३२.२ टक्के इतकी आहे.
हा पाऊस पिकांसाठी आणि रखडलेल्या पेरण्यांसाठी अत्यंत समाधानकारक ठरला. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्या युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २ लाख १८ हजार ६११ आहे. १ लाल ९२ हजार ३४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. साेयाबीनचे १ लाख २५ हजार ६५४ हेक्टर सरासरी ५९ हजार ७०४ सरासरी क्षेत्र असून असून १ लाख ४६१ हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीचे ५९ हजार ७०४ सरासरी क्षेत्र असून ४५ हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
४ लाख ६ हजार ५५४ हेक्टर खरीपाचे क्षेत्र
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६ हजार ५५४ हेक्टर इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ४० हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच जिल्ह्याने एकूण ८४ टक्के पेरणीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. सध्या शेतशिवारात पेरणीच्या कामांची मोठी लगबग पाहायला मिळत असून, उर्वरित क्षेत्रावरील पेरण्याही लवकरच पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी