अमरावतीच्या दोन तरुणांची एटीएसकडून चौकशी
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कथित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाद्वारे संबंध असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री राज्यभरात एकाच वेळी 112 ठिकाणी छापेमारी केली. या मोहिमेअंतर्गत विदर्भातील नागपूर
अमरावतीत एटीएसची मोठी धाड


अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कथित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाद्वारे संबंध असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री राज्यभरात एकाच वेळी 112 ठिकाणी छापेमारी केली. या मोहिमेअंतर्गत विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील माहुली-जहांगीर आणि वलगाव येथील टाकरखेडा-शंभू परिसरातील दोन तरुणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची अनेक तास कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणांनी आपल्या मोबाईलवर एका अज्ञात लिंकद्वारे ते एका सोशल मीडिया ग्रुपशी जोडले गेल्याचा दावा केला आहे. त्या ग्रुपमधील सदस्यांशी आपला कोणताही वैयक्तिक संबंध, व्यवहार किंवा थेट संपर्क नसल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, एटीएसने दोन्ही तरुणांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा, व्हॉट्सऍप चॅट्स, सोशल मीडियावरील हालचाली आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांकडून संबंधित सोशल मीडिया ग्रुपचा कथित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी किंवा इतर कोणत्याही संशयित गुन्हेगारी अथवा दहशतवादी नेटवर्कशी संबंध आहे का, याची पडताळणी केली जात आहे.

एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या संबंधित दोन्ही तरुणांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तांत्रिक आणि डिजिटल तपासाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande