परभणी : मोटारसायकल चोरीच्या 8 गुन्ह्यांचा भंडाफोड, दोन आरोपी जेरबंद
परभणी, 11 जुलै (हिं.स.)बोरी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीच्या 8 गुन्ह्यांचा पर्दाफाश : दोन आरोपी जेरबंद; 3 लाख 95 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त बोरी पोलिसांनी मोटारसायकल चोरीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ गुन्ह्यांचा उलगडा केला आ
परभणी : मोटारसायकल चोरीच्या 8 गुन्ह्यांचा भंडाफोड, दोन आरोपी जेरबंद


परभणी, 11 जुलै (हिं.स.)बोरी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीच्या 8 गुन्ह्यांचा पर्दाफाश : दोन आरोपी जेरबंद; 3 लाख 95 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त बोरी पोलिसांनी मोटारसायकल चोरीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 3 लाख 95 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या सूचनेनुसार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आडगाव फाटा परिसरात सापळा रचून गजानन जनार्दन कोकाटे (वय 25) आणि बाळासाहेब रामकिशन शिंदे (वय 23, दोघे रा. खानापूर फाटा, परभणी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

दोन्ही आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरीच्या आणखी चार मोटारसायकली कमी किमतीत विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित खरेदीदारांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातील चार मोटारसायकलीही जप्त केल्या. त्यामुळे या प्रकरणात एकूण आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान आरोपींनी बोरी, जिंतूर, नवा मोंढा, नानलपेठ तसेच नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अभिलेखांची पडताळणी केली असता संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्यासह राजेश जटाळ, प्रताप साळवणे, अमोल मुंढे, संघसेन कांबळे आणि प्रकाश मोरे यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande