
जालना, 11 जुलै (हिं.स.)।
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'माय भारत' नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा सल्लागार समितीची बैठक व्हर्च्युअल माध्यमातून पार पडली. तसेच उपस्थित सहाय्यक जिल्हाकारी डॉ. रंगमंजु तर जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे यांनी 'माय भारत' नोंदणी मोहिमेचे सादरीकरण केले.
बैठकीत 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'माय भारत' नोंदणी मोहिमेच्या नियोजनाचा व अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC), स्काऊट-गाईड तसेच विविध युवा मंडळांच्या माध्यमातून 15 वर्षांवरील युवक-युवतींची 'माय भारत' पोर्टलवर मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश दिले.
ही मोहीम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'माय भारत नोडल अधिकारी' आणि 'माय भारत अॅरम्बेसेडर' यांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना अधिक सक्षम करून त्यांना थेट 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. तसेच जिल्ह्यात नवीन युवक मंडळांची निर्मिती करून त्या माध्यमातून युवकांचे संघटन अधिक मजबूत केले जाईल. वार्षिक कृती आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध राष्ट्रीय व विभागीय कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय स्थापित केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने विकसित भारत पदयात्रा, युथ क्लब डेव्हलपमेंट कॅम्पेन, स्पोर्ट्स मीट, नशा मुक्त भारत अभियान यांसारख्या महत्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असून, या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे युवा पिढीमध्ये जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis