
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील कामाला मोठी गती मिळाली आहे. जिल्ह्यातील 15 लाख 41 हजार 7 मतदारांपैकी 12 लाख 40 हजार 211 (80.48 टक्के) गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी वितरित केले आहेत. तसेच 3 लाख 23 हजार 224 (20.97 टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन, तर 3 लाख 22 हजार 449 (20.92 टक्के) फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
मोहिमेचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची विशेष आढावा व प्रशिक्षण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार उपस्थित राहून त्यांनी आवश्यक मार्गदर्शन केले.
आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक सहकार्य करून गणना फॉर्म अचूक भरून वेळेत जमा करावेत. यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी होऊन मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगती पुढीलप्रमाणे आहे.
95-जिंतूर विधानसभा मतदारसंघ : एकूण 3,82,716 मतदारांपैकी 2,76,050 (72.13%) गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 71,165 (18.59%) फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 71,023 (18.56%) फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे.
96-परभणी विधानसभा मतदारसंघ : एकूण 3,43,921 मतदारांपैकी 3,03,533 (88.26%) गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 51,123 (14.86%) फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 50,719 (14.75%) फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे.
97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघ : एकूण 4,17,481 मतदारांपैकी 3,53,461 (84.67%) गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 1,11,689 (26.75%) फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 1,11,572 (26.73%) फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे.
98-पाथरी विधानसभा मतदारसंघ : एकूण 3,96,889 मतदारांपैकी 3,07,167 (77.39%) गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 89,247 (22.49%) फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 89,135 (22.46%) फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील सर्व कामे वेळेत, अचूक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. गणना फॉर्मचे शंभर टक्के वितरण, प्रत्येक मतदारापर्यंत घरभेटीद्वारे पोहोचणे, संगणकीकरण, पडताळणी, मॅपिंग आणि मतदार यादीतील अनॉमली कमी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन आढावा घेऊन प्रभावी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी बीएलओ यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत डिजिटायझेशन, पडताळणी, मॅपिंग आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रत्येक नोंद अचूक राहील, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीस जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis