तिवसा तालुक्यात बोगस बियाण्यांमुळे नुकसान
दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : तिवसा तालुक्यात बोगस व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी शुक्रवारी आकस्मिक दौरा करून नुकसानग्रस्त
जिल्हाधिकारी आशिष येरेकर पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर बोगस बियाणे,दोषी कंपन्या वर दिलेत कारवाईचे आदेश


दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : तिवसा तालुक्यात बोगस व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी शुक्रवारी आकस्मिक दौरा करून नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी दोषी बियाणे कंपन्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा येथील शेतकरी साहेबराव अळसपूरे यांच्या शेताला भेट देऊन बियाण्यांची उगवण, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत कृषी विभागाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे त्वरित पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळेल, यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

प्रशासनाच्या माहितीनुसार, तिवसा तालुक्यात निकृष्ट बियाण्यांबाबत आतापर्यंत 103 तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी 81 तक्रारी सोयाबीन बियाण्यांशी संबंधित आहेत. अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतभेटी, पंचनामे आणि पुढील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande