
परभणी, 11 जुलै (हिं.स.)।
संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांनी खरीप हंगामाचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावे, असे आवाहन कुलगुरु डॉ. इंद्रमणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांच्या प्रेरणेने तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून 31 शास्त्रज्ञांनी थेट शेतकर्यांशी संवाद साधत विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.
उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या 14 चमूंनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले. यामध्ये सुमारे 250 हून अधिक शेतकर्यांशी संपर्क साधून खरीप पिकांचे व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर, बीजप्रक्रिया, सघन कापूस लागवड, सोयाबीन व कापूस पिकांतील तण व्यवस्थापन, सेंद्रिय भाजीपाला लागवड, खत व्यवस्थापन तसेच पशुधन आणि फळबाग व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गंगाखेड (जि. परभणी) येथे आयोजित मुख्य कार्यक्रम कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शेतकर्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांनी संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांनी खरीप हंगामाचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादनातील जोखीम कमी करावी तसेच निविष्ठांचा संतुलित वापर करून उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांचा आणि शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रतिकूल हवामानातही अधिक उत्पादन मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषी तंत्रज्ञानाच्या अवलंबातून उत्पादनवाढ साधता येईल, असे सांगितले. तसेच विद्यापीठामार्फत दर मंगळवार आणि शुक्रवार आयोजित ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकर्यांना केले. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाच्या समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार्या कृषी माहितीची तसेच खरीप, रब्बी आणि महिला शेतकरी मेळाव्यांची माहिती दिली. विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक निविष्ठा, जैविक खते आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर वाढविण्याचा सल्ला दिला. उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी फळबाग व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तर रोगशास्त्रज्ञ डॉ. आनंद दौंडे यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व, जैविक बुरशीनाशकांचा वापर आणि खरीप हंगामातील रोग व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमात विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषी महाविद्यालय लातूर, कापूस संशोधन केंद्र नांदेड, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच विविध संशोधन प्रकल्पांतील शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis