
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी वडिलांसह सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी तालुक्यातील एका गावात 17 वर्षे 8 महिने वयाच्या मुलीचा विवाह एका युवकासोबत करण्याचा निर्णय तिच्या काही नातेवाईकांनी घेतला होता. मुलीने या विवाहास नकार देत वडिलांना आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, तक्रारीनुसार वडिलांनी तू लग्न केले नाहीस तर मी विष प्राशन करून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याने ती मानसिक दबावाखाली आली.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, वडिलांच्या धमकीमुळे घाबरून संबंधित अल्पवयीन मुलीने विवाहास संमती दिली. विवाहाच्या वेळी तिचे काकाही उपस्थित होते. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही काही नातेवाईकांनी हा विवाह लावून दिल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सुरुवातीला शेंदुरजनाघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटना मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण मोर्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मोर्शी पोलिसांनी वडील, काकासह एकूण सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी