भूखंड खरेदीच्या व्यवहारात 3.38 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : दोन भूखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारात ईसारचिठ्ठी करूनही व्यवहार पूर्ण न करता 3 लाख 38 हजार रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनीष हरीश पारवानी (रा. कलो
भुखंड खरेदीत ३ लाखांनी फसवणूक दोन दलालांसह चौघांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा


अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : दोन भूखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारात ईसारचिठ्ठी करूनही व्यवहार पूर्ण न करता 3 लाख 38 हजार रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मनीष हरीश पारवानी (रा. कलोतीनगर), मंगेश रामदास तायडे (रा. आष्टी), संजय विश्वास गायकवाड (रा. संजय गांधी नगर) आणि राजेश उर्फ राजेंद्र शंकरराव अहीर (रा. जनता कॉलनी, अमरावती) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली.

दारव्हा येथील तुषार कॉलनीतील रहिवासी मनोज उद्धव येळणे (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संशयितांपैकी संजय गायकवाड आणि राजेश उर्फ राजेंद्र अहीर यांनी भूखंड व्यवहारात मध्यस्थी केली होती.

मनोज येळणे यांनी 11 मे 2022 रोजी मनीष पारवानी यांच्याकडील 2,623 चौरस फुटांचा भूखंड तसेच मंगेश तायडे यांच्या रहाटगाव येथील शेत सर्व्हे क्रमांक 112/2 मधील प्लॉट खरेदीसाठी ईसारचिठ्ठी केली होती. त्यावेळी दोन्ही विक्रेत्यांना प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपये, असे एकूण 3 लाख रुपये अदा करण्यात आले. तसेच व्यवहारासाठी मध्यस्थी करणाऱ्या दोन्ही दलालांना कमिशन म्हणून 31 हजार रुपये ऑनलाइन (फोनपे)द्वारे देण्यात आले. याशिवाय खरेदीसंदर्भातील कागदपत्रे तयार करण्यासाठी 7 हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रक्कम स्वीकारूनही भूखंडाचा व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. त्यामुळे एकूण 3 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande