एचएआरसीकडून निराधार महिलेला शेळी व करड्यांची मदत : मुलाचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एच.ए.आर.सी.), परभणीच्या वतीने मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील निराधार विधवा भाग्यश्री गुलाब कनकुटे यांना उदरनिर्वाहासाठी एक शेळी व दोन करडे भेट देण्यात आले. तसेच त्यांच्या इयत्ता आठ
एचएआरसीकडून निराधार महिलेला शेळी व करड्यांची मदत : मुलाचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले


परभणी, 11 जुलै (हिं.स.) : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एच.ए.आर.सी.), परभणीच्या वतीने मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील निराधार विधवा भाग्यश्री गुलाब कनकुटे यांना उदरनिर्वाहासाठी एक शेळी व दोन करडे भेट देण्यात आले. तसेच त्यांच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याच्या शिक्षणासाठीही आर्थिक मदतीची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे.

जिल्हा परिषद शाळा, कोल्हा येथे आयोजित शैक्षणिक पालकत्व उपक्रमादरम्यान भाग्यश्री कनकुटे यांच्या मुलाची एच.ए.आर.सी.च्या प्रतिनिधींशी भेट झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी कुटुंबाच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनंता कदम आणि संदीप लटपटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून माहितीची पडताळणी केली.

भाग्यश्री कनकुटे यांच्या पतीचे 2012 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा सांभाळ त्यांच्या निराधार मावशी संगीता मारुती भदर्गे करीत आहेत. दोघीही आपल्या भावाच्या आश्रयाने राहत असून तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. स्वतःचे घर, शेती, पेन्शन किंवा अन्य नियमित उत्पन्नाचे साधन नसल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे.

ही बाब लक्षात घेऊन एच.ए.आर.सी.ने दात्यांच्या सहकार्याने सुमारे 16 हजार रुपये किमतीची एक शेळी व दोन करडे भेट दिले. या मदतीमुळे भाग्यश्री कनकुटे यांना शेळीपालनाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून स्वावलंबी जीवन जगण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही संस्थेने शैक्षणिक पालकत्वाच्या माध्यमातून स्वीकारली आहे.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन सत्यनारायण चांडक, डॉ. दिनेश भुतडा, संतोष माहुरकर, किशोर सोळुंके, अनंता कदम, आशिष शिंदे, बाबासाहेब भदर्गे, गोविंद निर्वळ आणि संदीप लटपटे उपस्थित होते.

एच.ए.आर.सी. संस्थेमार्फत आजपर्यंत 96 हून अधिक निराधार महिलांना शेळी, शिवणयंत्र, डाळ मिल, किराणा व्यवसायासाठी साहित्य आदी स्वरूपात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच शेकडो अनाथ, एकल पालक आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व व शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. वंचित घटकांना स्वावलंबी बनविणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा संस्थेच्या कार्याचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande