
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी शनिवारी पाथरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात कॉ. दीपक लिपने, कॉ. भारत गायकवाड, कॉ. बळीराम वर्हाडे, कॉ. भास्कर यादव, कॉ. भारत फुके, कॉ. अंबादास साळवे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच 2019 मधील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा, नियमित कर्जदारांवरील जाचक अटी हटवाव्यात आणि सहकार क्षेत्रातील कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनाही कर्जमाफी योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा, मायक्रो फायनान्स, सोनतारण तसेच इतर शेतीसंबंधित कर्जांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
कर्जमाफीवरील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, शासनाने 'सातबारा कोरा' करण्याच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis