
बीड, 11 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६ दरम्यान प्रश्नोत्तरे सत्रात आमदार सुरेश धस यांनी सभागृहात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्या झाडांचे संवर्धन आणि संगोपन अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे वृक्षारोपणाची कामे केवळ कंत्राटदारांमार्फत न देता, निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी केली.
स्वयंसेवी संस्था नफा कमावण्यासाठी नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या भावनेतून काम करतात. त्यामुळे नवीन टेंडर प्रक्रियेत अशा संस्थांचा सहभाग निश्चित करून त्यांना संधी देण्यासाठी धोरण व नियमावली तयार करावी, अशी भूमिका सभागृहात मांडली.यावर मंत्री महोदय छत्रपती मा.ना.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्याबाबत आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis