
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। सेलू तालुक्यात एकूण 165 मतदार यादी भाग असून 1 लाख 45 हजार 592 मतदारांची नोंद आहे. त्यापैकी 1 लाख 28 हजार 580 मतदारांचे बीएलओ पद्वारे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित 17 हजार 12 अनमॅप्ड मतदार तसेच 23 हजार 176 अनॉमली मतदारांच्या नोंदींची तपासणी सुरू असून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सेलू तालुक्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम 2026 वेगाने राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली सेलू येथे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, बीएलओ, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी मतदार याद्या अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मतदार पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 29 जुलै 2026 पर्यंत बीएलओमार्फत गणना फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर पडताळणी व सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बैठकीत मार्गदर्शन करताना शैलेश लाहोटी यांनी स्पष्ट केले की, ज्या मतदारांचे छायाचित्र स्पष्ट आहे त्यांचे नवीन छायाचित्र घेण्याची आवश्यकता नाही. केवळ अस्पष्ट किंवा अंधुक छायाचित्रे असलेल्या मतदारांचे फोटो अद्ययावत करावेत. तसेच अनमॅप्ड अथवा नाव, जन्मतारीख, वय आदी बाबींमध्ये त्रुटी असलेल्या मतदारांच्या नोंदींची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांचा समावेश अंतिम यादीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बीएलओ, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व पत्रकार उपस्थित होते. मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis