
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : मंदिर संस्कृतीचे जतन व संवर्धन, मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम करणे तसेच मंदिरांशी संबंधित विविध प्रश्नांवर सामूहिक भूमिका निश्चित करण्याच्या उद्देशाने विदर्भ देवस्थान समितीच्या वतीने शहरातील श्रीकृष्ण मंदिर, माता खिडकी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील 60 हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले.
बैठकीत मंदिर क्षेत्रासमोरील विविध आव्हाने, मंदिरांचे सुयोग्य व्यवस्थापन, धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय, मंदिरांची नोंदणी, प्रशासकीय प्रक्रिया तसेच कायदेशीर बाबींसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी मंदिर संस्कृतीचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रे न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करणारी केंद्रे म्हणून विकसित व्हावीत, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत मंदिर संघटनांच्या आगामी कार्याचा आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा झाली. जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये परस्पर समन्वय वाढवून मंदिरांच्या समस्या शासन व संबंधित विभागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटितपणे काम करण्यावर भर देण्यात आला. तसेच मंदिरांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यात आले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी