
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। : पंढरपूर वारीच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाण्यातील पर्यावरणप्रेमी तथा 'ट्री मॅन ऑफ ठाणे' म्हणून ओळखले जाणारे विजयकुमार कट्टी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 'भक्ती आणि पर्यावरण' या संकल्पनेवर आधारित छायाचित्र मालिका प्रकाशित करून वारी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विजयकुमार कट्टी यांनी सांगितले की, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी यात्रा नसून पृथ्वीशी असलेल्या आपल्या जिवंत नात्याचा अनुभव आहे. वारीतील प्रत्येक पाऊल भूमीला केलेले वंदन असल्याची भावना जपत त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तांत्रिक कारणांमुळे ७ ते १० जुलैदरम्यानची छायाचित्रे एकत्रित प्रसिद्ध करण्यात आली असून, १२ ते २५ जुलैदरम्यान संपूर्ण वारी प्रवासातील छायाचित्रे आणि अनुभव दररोज त्यांच्या डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश भक्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा आहे. वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत समाजात सकारात्मक संदेश पोहोचावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
या छायाचित्र मालिकेद्वारे वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाशी सुसंवादाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी छोटासा का होईना, पण आपला वाटा उचलावा, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)