
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। रायगड-रत्नागिरी लोकसभेचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यातील जावळी येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, आधुनिक शिक्षण हा विकसित भारताचा मजबूत पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि प्रचंड क्षमता असून योग्य संधी व सुविधा मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात. सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये अधिक क्षमता असते, असे त्या म्हणाल्या. तसेच गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष केकाणे, संचालक शांताराम भोरावकर (गुरुजी), बाळाराम नवगणे, मुख्याध्यापिका नेहा केकाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)