प्राचार्य राजाराम राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
छत्रपती संभाजीनगर, 11 जुलै (हिं.स.) : वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य राजाराम राठोड (वय ९०) यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने मृद व जलसंधार
Q


छत्रपती संभाजीनगर, 11 जुलै (हिं.स.) : वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य राजाराम राठोड (वय ९०) यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

“तांडा-वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राजाराम राठोड सदैव स्मरणात राहतील,” अशा शब्दांत मंत्री संजय राठोड यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अंत्यसंस्कारावेळी खा. डॉ. कल्याण काळे, माजी खा. इम्तियाज जलील, आ. राजेश राठोड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्राचार्य संजीव रेड्डी, गौरसेना अध्यक्ष संजय चव्हाण, बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापुराव राठोड, बापू घडमोडे, प्रा. सुसिंग जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्यासह वसंतराव नाईक महाविद्यालय, बळीराम पाटील विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राचार्य राजाराम राठोड यांनी वंचित, शोषित, भटक्या-विमुक्त तसेच तांडा-वाडीतील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शिक्षणाची पंखे दिली. अनेकांच्या हातात पुस्तके दिली, आत्मविश्वास निर्माण केला आणि अनेक कुटुंबांच्या भविष्याला नवी दिशा दिली.

समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे वसंतराव नाईक यांचे स्वप्न त्यांनी आयुष्यभर निष्ठेने जपले. त्यांनी केवळ महाविद्यालय उभारले नाही, तर हजारो विद्यार्थी घडवले आणि जबाबदार नागरिक निर्माण केले. गरीब, गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.

प्राचार्य राजाराम राठोड यांनी १९६० ते जून १९६९ या कालावधीत उदगीर तालुक्यातील विद्यानिधी हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर १९६६ ते १९७२ दरम्यान उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे संघटन सचिव म्हणूनही त्यांनी काम केले.

१९७२ ते १९९७ या काळात त्यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य केले. १९६० मध्ये मराठवाड्यात वसतिगृह सुविधा सुरू करण्याचा पुढाकार घेतला. १९७२ मध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयाची आणि १९८३ मध्ये बळीराम पाटील प्राथमिक शाळेची स्थापना केली.

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे सचिव म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

प्राचार्य राजाराम राठोड यांच्या पश्चात ऍड. अभय राठोड, नितीन राठोड, डॉ. बिपीन राठोड ही मुले, जावई डॉ. अशोक चव्हाण, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून हजारो जीवनांना दिशा देणाऱ्या या शिक्षणमहर्षीच्या निधनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande