
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : महापालिका आयुक्तांची मौलाना आझाद वाचनालयाला भेट :वाचन सुविधांचा आढावा; अनुपस्थित कर्मचार्यास कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयाला भेट देऊन तेथील पुस्तकसंपदा, वाचन सुविधा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वाचकांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.
वाचनालयातील कर्मचार्यांच्या नियमित उपस्थितीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेचे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनीही वाचनालयाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान कार्यालयीन वेळेत एक कर्मचारी अनुपस्थित आढळून आल्याने संबंधित कर्मचार्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. पाहणीवेळी उपायुक्त कांबळे यांनी विभागप्रमुख रिजवान आणि उपस्थित कर्मचार्यांशी संवाद साधून वाचनालय परिसराची नियमित स्वच्छता राखणे, वाचकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देणे तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना केल्या.
कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचार्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जबाबदारीने कर्तव्य बजावावे. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. महापालिकेच्या वाचनालयांमधील सेवा अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या अचानक पाहण्या सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis