
हल्लेखोरावर कठोर कारवाई व महापौरांना सुरक्षा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परभणी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून महापौरांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार, परभणी महानगरपालिकेतील महापौर दालनात शेख रफिक नामक व्यक्तीने महापौर सय्यद इकबाल यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण आणि सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील कारणांचा शोध घ्यावा तसेच संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महापौरांच्या सुरक्षेत वाढ करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis