
रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे पटवर्धन हायस्कूल येथे मत्स्य शेतीतील रोजगार संधी या विषयावर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात मत्स्य व्यवसायातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. सुशील कांबळे यांनी मत्स्य शेतीतील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती दिली, तर प्रतीक यादव यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील यशस्वी कोळंबी संवर्धक तथा मत्स्य अभियांत्रिकी पदविकाधारक श्रद्धा अनगोळकर-कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजापूर व दापोली तालुक्यांत त्यांनी उभारलेल्या कोळंबी शेती प्रकल्पांद्वारे यशस्वी उत्पादनाबरोबरच अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या फार्मवर वर्षातून दोन वेळा निर्यातक्षम कोळंबीचे उत्पादन घेतले जाते.
इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी यांनी नैसर्गिक जलस्रोतांतील मत्स्यसाठा प्रदूषण आणि अनियंत्रित मासेमारीमुळे घटत असल्याचे सांगितले. मत्स्य शेतीद्वारे मत्स्योत्पादन वाढविण्यासह रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असून तरुणांनी आवश्यक प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी