
जालना, 11 जुलै (हिं.स.)जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना व जालना जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व महिलांसाठी सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी महिला सुरक्षेसाठी जालना पोलिस दलाकडून राबविले जाणारे उपक्रमाची माहिती दिली व आत्मस्वंरक्षणासाठी महिलांनी सेल्फ डिफेन्स शिकणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, गणेश चिमणकर यांनी कौशल्य विकासाद्वारे आजच्या युवतींचे सक्षमीकरण करून सक्षम राष्ट्राची उभारणी करता येईल हा संदेश दिला. सदर कार्यशाळेत जालना जिल्ह्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयाच्या 90 विद्यार्थींनी व महिला यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्वसंरक्षणाची तंत्र आत्मसात केले. कार्यशाळेच्या समारोपात गीता नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल येवले, कौशल्य विकास अधिकारी,जालना, संजय सोनवणे, जालना पोलिस दल व दत्ता जाधव, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी तसेच डॉ अमोल परिहार, रविंद्र पडमुख, विशाल जगरवाल व दिपक पालवे यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis