
पालघर, 11 जुलै (हिं.स.)। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याच दरम्यान केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्याने घराला वेढा दिल्यानंतर एका कुटुंबाला मृतदेहासह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवीपाडा येथील अनुसया मनोहर लिलका या 55 वर्षीय महिलेवर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र, परिसरातील रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्णवाहिकेला पुढे जाता आले नाही. त्यामुळे नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करत मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत न्यावा लागला.
दरम्यान, सकाळच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढल्याने परिसरात पुराचे पाणी वेगाने वाढू लागले. काही वेळातच लिलका यांच्या घरात पाणी शिरले. पाण्याची पातळी वाढत असल्याने घरातील सामानासह मृतदेहाचेही नुकसान होण्याची भीती कुटुंबीयांना वाटू लागली. अशा गंभीर परिस्थितीत कुटुंबीयांनी धाडस दाखवत घराच्या स्वयंपाकघराच्या छतावरील दोन सिमेंट पत्रे फोडून मृतदेह वरच्या छतावर नेला. त्यानंतर पार्थिव सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर प्लास्टिक टाकण्यात आले.
घरातील लहान मुले, महिला आणि इतर कुटुंबीयांसह सर्वांना जीव मुठीत धरून चार तास छतावर बसून राहावे लागले. एका बाजूला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या निधनाचे दुःख होते, तर दुसऱ्या बाजूला वाढत्या पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेली भीती होती. या दुहेरी संकटामुळे लिलका कुटुंबीय मानसिक आणि भावनिकदृष्ट्या हादरून गेले.
काही तासांनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि पुराचे पाणी हळूहळू ओसरल्यानंतर मृतदेह खाली आणण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व्यवस्था केली. देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेने नैसर्गिक आपत्तीसमोर सामान्य नागरिकांची होणारी परवड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुराच्या परिस्थितीत एका कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठीही तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. या हृदयद्रावक प्रसंगामुळे संपूर्ण देवीपाडा परिसर सुन्न झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule