
- नंददीप फाउंडेशनच्या प्रयत्नांनी घडले भावनिक पुनर्मिलन
यवतमाळ, 11 जुलै (हिं.स.) : मानसिक आजारामुळे तब्बल वीस वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेल्या परभणी जिल्ह्यातील पिराजी डोईफोडे यांचे अखेर त्यांच्या कुटुंबीयांशी पुनर्मिलन झाले. नंददीप फाउंडेशनने उपचार, पुनर्वसन आणि अथक शोधमोहीम राबवत पिराजींना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले. यावेळी मुलगी अर्चनाने आयुष्यात प्रथमच वडिलांना पाहिल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
यवतमाळ–आर्णी मार्गावरील जवळा परिसरात सुमारे सहा महिन्यांपूर्वी पिराजी दयनीय अवस्थेत आढळून आले होते. अंगावर अस्वच्छ कपडे, विस्कटलेली अवस्था आणि रस्त्यावर ओरडत भटकणाऱ्या पिराजींना नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे व त्यांच्या टीमने पाहिले.
त्यानंतर त्यांना नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना निवारा, भोजन आणि औषधोपचाराची सुविधा देण्यात आली. डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या उपचारांमुळे सहा महिन्यांत त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.
उपचारादरम्यान पिराजींच्या बोलण्यातून परभणी जिल्ह्यातील काही गावांची माहिती मिळाली. त्यानंतर नंददीप फाउंडेशनच्या पुनर्वसन टीमने त्यांच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. सावरगाव, टाकळगाव, डोंगर पिंपळा, गंगाखेड, आष्टुर, चाटोरी यासह आठ गावांमध्ये चौकशी करूनही सुरुवातीला यश मिळाले नाही.
अखेर ग्रामपंचायत सदस्य आकाश चव्हाण यांच्या मदतीने पिराजींचे चुलत भाऊ विक्रम डोईफोडे यांच्याशी संपर्क झाला. पिराजी मागील वीस वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले.
यानंतर नंददीप फाउंडेशनच्या टीमने पिराजींना कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुणे परिसरातील मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी यामुळे प्रवासात अडचणी निर्माण झाल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत टीमने अखेर आळंदी गाठून पिराजींची त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणली.
वीस वर्षांनंतर पिराजी कुटुंबासमोर उभे राहताच भावनिक वातावरण निर्माण झाले. विशेषतः त्यांची मुलगी अर्चना हिने आयुष्यात प्रथमच वडिलांना पाहिले.
पिराजी घरापासून दूर गेले तेव्हा अर्चना लहान होती. त्यामुळे वडिलांचा चेहरा, आवाज याची कोणतीही आठवण तिच्याकडे नव्हती. वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वडिलांना समोर पाहताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
पत्नी, मुलगा आणि मुलीने पिराजींचे स्वागत करत त्यांना पुन्हा कुटुंबात सामावून घेतले. हा पुनर्वसन प्रवास नंददीप फाउंडेशनचे पुनर्वसन समन्वयक निशांत सायरे, कार्यकर्ते कार्तिक भेंडे, कृष्णा मुळे, अक्षय बानोरे आणि स्वप्नील सावळे यांच्या प्रयत्नांतून पूर्ण झाला.
“रस्त्यावर भटकणाऱ्या मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला केवळ निवारा आणि उपचार देणे पुरेसे नाही. त्याच्या हरवलेल्या गावाचा, घराचा आणि नात्यांचा शोध घेऊन त्याला पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन करणे, हेच आमच्या पुनर्वसन कार्याचे अंतिम ध्येय आहे,” असे नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे यांनी सांगितले.
एका मुलीची वीस वर्षांची अनामिक प्रतीक्षा आणि एका हरवलेल्या बापाची रस्त्यावरील भटकंती अखेर एका भावनिक क्षणी संपली. पिराजी आणि त्यांच्या कुटुंबाचे हे पुनर्मिलन नंददीप फाउंडेशनच्या पुनर्वसन कार्याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी