
परभणी, 11 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजने' अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै 2026 पूर्वी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अनुसरून आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्य करणे, हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग अर्जदारांसाठी किमान वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयाने ज्येष्ठ असलेल्या विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच ज्यांची उपजीविका प्रामुख्याने कला क्षेत्रावर अवलंबून असून अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, अशाच पात्र कलाकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाची नियमित मासिक पेन्शन अथवा कोणत्याही महामंडळाचे निवृत्तीवेतन घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), संबंधित शासकीय प्रमाणपत्रे तसेच शिफारसपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन 31 जुलै 2026 पूर्वी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis