
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : औद्योगिक वसाहतींमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ही गंभीर समस्या असून महावितरणने त्यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून उद्योजकांची दिशाभूल करू नये, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता प्रदीप अंधारे, उद्योग विभागाचे उपमहाव्यवस्थापक महेश निकम, नांदगाव पेठ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आफक सुभेदार, अमरावती एमआयडीसीचे किरण पातुरकर, कौशल्य व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी राजेश शेळके यांच्यासह विविध उद्योजक आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
बैठकीत नांदगाव पेठ, अमरावती आणि सातूर्णा औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होत असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची व्यथा मांडली.
उद्योजकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर खासदार डॉ. बोंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना उद्योगांसाठी अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यातील वाढती औद्योगिक वीज मागणी लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करावे, आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात आणि उद्योजकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
सततच्या वीज समस्येमुळे उद्योगांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याने या प्रश्नावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी