मिटमिटा परिसरात पोलिसांचा छापा; ५.६३ कोटींचा मुद्देमाल जप्त
कारवाईत बेहिशोबी रोकडीसह शस्त्रसाठा गवसला छत्रपती संभाजीनगर, ११ जुलै : शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री उशिरा एका घरावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २६
मिटमिटा परिसरात पोलिसांचा छापा; ५.६३ कोटींचा मुद्देमाल जप्त


कारवाईत बेहिशोबी रोकडीसह शस्त्रसाठा गवसला

छत्रपती संभाजीनगर, ११ जुलै : शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री उशिरा एका घरावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड, ६,३५० जिवंत काडतुसे, २१ घातक शस्त्रे, विदेशी मद्य तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मिटमिटा परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड आणि अग्निशस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना १००, २००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली.

याशिवाय, २ पिस्तुले (मॅगझिनसह), ४ रायफल (१२ बोअर, एअर गन आणि .२२), १ तलवार तसेच १७ चाकू व गुप्ती अशी एकूण २१ शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या चार शस्त्रांचे परवाने एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

कारवाईदरम्यान १२ बोअरची ६३२, ७.६५ एमएमची १,८७८ आणि .२२ कॅलिबरची ३,८४० अशी एकूण ६,३५० जिवंत काडतुसे (किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये) जप्त करण्यात आली. तसेच १५१.३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत २१ लाख ३४ हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. विदेशी मद्य व इतर साहित्याचाही या कारवाईत समावेश असून सर्व मिळून ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून बेहिशोबी रोकड, शस्त्रसाठा आणि जप्त करण्यात आलेल्या इतर मालमत्तेचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande