कायदा हातात घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई, गुन्हा करणाऱ्यांवरही कायदेशीर कार्यवाही
लातूर, 11 जुलै (हिं.स.)। रेनापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खारोळा येथे घडलेल्या घटनेत शेतातील कॉपर वायर चोरी करण्याच्या प्रयत्नानंतर संबंधित अल्पवयीन मुलांना पकडून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरण
पोलीस कारवाई


लातूर, 11 जुलै (हिं.स.)।

रेनापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खारोळा येथे घडलेल्या घटनेत शेतातील कॉपर वायर चोरी करण्याच्या प्रयत्नानंतर संबंधित अल्पवयीन मुलांना पकडून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणात संबंधित तीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांच्यावर गु. र. न. 240/2026 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये चोरीसंदर्भातील गुन्हा स्वतंत्रपणे नोंद करण्यात आला असून, दुसरीकडे संबंधित मुलांना मारहाण करून कायदा हातात घेतल्याप्रकरणी संबंधित तीन विधी संघर्ष बालक यांच्यापैकी एक जनाच्या फिर्यादीवरून 1. सचिन नारायण राऊतराव वय 40 वर्षे तसेच 2. नितीन गोविंद शिंदे वय 38 वर्ष यांच्यावर गु. र. न. 341/2026 कलम 118(1), 126 भारतीय न्याय संहिता अन्वय स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र मायने तसेच पोलीस निरीक्षक श्री सुधाकर देडे पोलीस स्टेशन रेनापुर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती व संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून शांतता व सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले.

या घटनेबाबत समाजमाध्यमांवर काही व्हिडिओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासंदर्भातही तांत्रिक तपास सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्धही आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

लातूर जिल्हा पोलीस दल सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की, चोरी, मारहाण किंवा अन्य कोणताही गुन्हा घडल्यास संबंधित व्यक्तीला स्वतः शिक्षा करण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कायद्याची अंमलबजावणी करणे ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी असून नागरिकांनी संयम, कायद्यावरील विश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांचे पालन करणे आवश्यक आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाचा स्पष्ट संदेश आहे — कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. गुन्हा करणाऱ्यावरही कारवाई होईल आणि कायदा हातात घेणाऱ्यावरही तितक्याच कठोरपणे कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजात शांतता, सलोखा आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande