रत्नागिरी : जाकादेवीतील विद्यार्थ्याची चोराला पकडण्यात धाडसी कामगिरी
रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय (जाकादेवी, ता. रत्नागिरी) येथील आठवीतील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने धाडस, प्रसंगावधान आणि चातुर्य दाखवत चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या
जाकादेवीतील विद्यार्थ्याची चोराला पकडण्यात धाडसी कामगिरी


रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय (जाकादेवी, ता. रत्नागिरी) येथील आठवीतील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने धाडस, प्रसंगावधान आणि चातुर्य दाखवत चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गेल्या एप्रिल महिन्यात चादरी विक्रीच्या निमित्ताने गावात फिरणाऱ्या एका व्यक्तीने परिसराची पाहणी करून दुसऱ्या दिवशी चोरीचा डाव आखला. तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोरी सुरू असल्याचे सर्वेशच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ आपल्या मोबाइलवर संशयिताचे चित्रीकरण केले आणि घरमालकाला याची माहिती दिली. तसेच घरमालकासह मोटारसायकलवरून आरोपीचा पाठलाग केला. निवळी परिसरात आरोपीला गाठल्यानंतर त्याच्याशी संवाद साधत प्रसंगावधान राखले. आरोपीने हातखंबा येथे जात असल्याचे सांगताच सर्वेश स्वतः त्याच्या मोटारसायकलवर बसला. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने सर्वेशला गाडीवरून ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वेशने धैर्य न गमावता हातखंबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली व मोबाइलमधील चित्रीकरणासह महत्त्वाचे पुरावे उपलब्ध करून दिले.

या प्रकरणात आरोपीने दोन घरांतून सुमारे ४३ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते सर्वेश मायंगडे याचा प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

सर्वेशची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आर्थिक अडचणींमुळे शाळेचा गणवेश घेणेही कठीण झाले होते. मात्र ज्यांच्या घरात चोरी झाली होती त्या कुटुंबाने त्याच्या धाडसी कामगिरीबद्दल कौतुक म्हणून त्याला शाळेचा नवीन गणवेश भेट दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande