मुरुडमध्ये स्वस्त धान्य वितरण ठप्प; मशीन बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय
ओटीपी व ऑनलाइन प्रणाली बंद; तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन शिधावाटपाची नागरिकांची मागणी
Subsidized food grain distribution stalled in Rood; residents inconvenienced due to machine malfunction.


रायगड, 11 जुलै (हिं.स.)। : मुरुड येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये गेल्या १० ते १५ दिवसांपासून शिधावाटप ठप्प झाल्याने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू नियमितपणे दिल्या जात असल्या, तरी तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही.

स्थानिक नागरिकांनी वारंवार स्वस्त धान्य दुकानांवर फेऱ्या मारूनही शिधा मिळत नसल्याची तक्रार केली आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणावर या शिध्यावर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांकडे विचारणा केली असता, शिधावाटपासाठी वापरल्या जाणाऱ्या ई-पॉस (e-POS) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असून ऑनलाइन प्रणाली कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ओटीपी न येणे, मशीनद्वारे पडताळणी न होणे अशा समस्या जिल्हास्तरावर निर्माण झाल्यामुळे शिधावाटप रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ही समस्या तातडीने सोडवून सर्व मशीनची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच तांत्रिक अडचण कायम असेल तर तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन पद्धतीने शिधावाटप सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महसूल प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुरुडमधील नागरिकांकडून होत आहे. लवकरात लवकर शिधावाटप पूर्ववत सुरू झाल्यास गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande