
ठाणे, 11 जुलै (हिं.स.)। ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील स्व. सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता तिसरी व चौथीच्या सुमारे ५५ ते ६० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा दबक्या आवाजात पालक वर्गात आहे.या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी जिल्हाधिकारी ठाणे तसेच महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
कृष्णा पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार, संबंधित विद्यार्थ्यांना १ व २ जुलै २०२६ रोजी मुंबईतील लोअर परळ येथे आयोजित विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी शाळेतर्फे नेण्यात आले होते. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रवास झाला. त्यांच्याकडूनच विद्यार्थ्यांना अल्पोपार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ५५ ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली असून अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आदी त्रासामुळे ठाण्यातील ज्युपिटरसह इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
उपमहापौर पाटील यांनी या घटनेत शाळा प्रशासनाने तातडीने जबाबदारी स्वीकारून आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा उल्लेख केला आहे. तसेच विषबाधेचे नेमके कारण काय, त्यासाठी जबाबदार अधिकारी किंवा संबंधित व्यक्ती कोण, याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, संबंधित शाळा प्रशासन व दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यक असल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिका उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मांडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर