
ठाणे, 11 जुलै (हिं.स.) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या जलजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पावसाळ्यात जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आपल्या इमारतींमधील जमिनीखालच्या तसेच इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी. तसेच पाण्याच्या टाक्यांच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून घरगुती वापरासाठी तसेच पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून व गाळून घ्यावे. यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर