
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। आंबिवली येथील पाझर तलावाला झालेल्या भगदाडीच्या घटनेनंतर कर्जत तालुक्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अॅड. कैलास मोरे यांनी शासनाने प्रस्तावित टोरेंट, पोशिर, शिलार, कोंढाणा आदी धरण प्रकल्पांचा सर्वंकष पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे मोरे यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात आधीच अनेक जलसाठे आणि धरण प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात कोणत्याही मोठ्या धरणात तांत्रिक बिघाड किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास नदीकाठची गावे, वाड्या, शेती आणि सखल भागांना मोठा फटका बसू शकतो. कर्जत शहरासह परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन घरे, दुकाने, शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच अशा परिस्थितीमुळे रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. शेती, जनावरे, सिंचन व्यवस्था, पर्यावरण आणि नदी परिसरातील जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. पूर ओसरल्यानंतर दूषित पाणी, साथीचे आजार आणि चिखलामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर एका तालुक्यात किती धरण प्रकल्प उभारायचे, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. तसेच कोणत्याही नव्या धरण प्रकल्पास मंजुरी देण्यापूर्वी सुरक्षा, पर्यावरणीय परिणाम, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि स्थानिक नागरिकांचे मत विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)