
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : बडनेरा–अमरावती रेल्वे मार्गावरील जुनी वस्ती, बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या चारपदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. आमदार रवी राणा यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे तसेच विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांच्यासह काही प्रमुख लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, रेल्वे विभागाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत सर्व संबंधित लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या बडनेरा–अमरावती रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक एस-01, जुनी वस्ती, बडनेरा येथे सुमारे 67 कोटी रुपये खर्चून चारपदरी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (ता. 12) सकाळी 11 वाजता जुना जकात नाका चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमासाठी आमदार रवी राणा यांनी स्वतंत्र निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली असून त्यामध्ये खासदार बळवंत वानखडे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, संजय खोडके, धीरज लिंगाडे आणि किरण सरनाईक यांची नावे नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र बडनेरा उपनगरातील नगरसेवकांची नावे त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे काही प्रमुख लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, विकासकामांच्या श्रेयावरून लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद होणे नवीन नाही. मात्र अधिकृत कार्यक्रमाशी संबंधित प्रमुख लोकप्रतिनिधींची नावे निमंत्रण पत्रिकेत नसल्याने राजकीय शिष्टाचार आणि संसदीय परंपरेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर खासदार बळवंत वानखडे किंवा विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, लोकार्पणापूर्वीच श्रेयवादाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी