रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर; विविध दुर्घटनांत मृतांचा आकडा १२ वर
रायगड, ११ जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, बुडणे तसेच झाड कोसळण्याच्या घटनांमुळे हे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा
Waterfalls and rivers prove deadly; 12 die in heavy rains in Raigad.


रायगड, ११ जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, बुडणे तसेच झाड कोसळण्याच्या घटनांमुळे हे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या दैनंदिन आपत्ती अहवालातून समोर आली आहे.

जिल्हा प्रशासनाने ११ जुलै रोजी जारी केलेल्या अहवालानुसार, सर्वाधिक मृत्यू पनवेल तालुक्यातील पांडवकडा धबधबा, वाघाचीवाडी, आपटा आणि दिवाघाट परिसरात घडलेल्या दुर्घटनांमध्ये झाले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ, बेडीसगाव आणि भागुचीवाडी येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. महाड तालुक्यातील कांगळे-बिरवाडी येथेही बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर खालापूरच्या बोरघाटात झाड कोसळून एका व्यक्तीचा जीव गेला. अलिबाग तालुक्यातील बेलवली-खानाव परिसरातही बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आपत्ती अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १२ मृत्यू, ३ जखमी आणि एक व्यक्ती पुराच्या पाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

पशुधनाचेही मोठे नुकसान

अतिवृष्टीचा फटका पशुधनालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ गायी, ३ बैल, १५ म्हशी आणि ९ डुकरांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६७ लहान जनावरे दगावली असून, ७,८३६ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

रोहा, खालापूर, माणगाव आणि पेण तालुक्यांमध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एनडीआरएफ पथक तैनात; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मान्सून-२०२६ च्या पार्श्वभूमीवर महाड येथे १ जुलैपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक तैनात करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी धबधबे, नद्या आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande