
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील अनेक गावांतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने भातपिके पाण्याखाली गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अद्याप नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ही बाब सामाजिक कार्यकर्ते विजय बक्कम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. यावेळी त्यांनी निवेदन सादर करून नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली.
विजय बक्कम यांनी सांगितले की, मंत्री आदिती तटकरे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
माणगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक नियोजन भातशेतीवर अवलंबून असते. यंदाच्या अतिवृष्टीमुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)