परभणी : येलदरी धरणावरील क्रेन कोसळल्याने कामगार गंभीर जखमी
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाच्या गेट दुरुस्तीच्या कामाकरीता उभारलेले क्रेन कोसळल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला. येलदरी धरणाच्या गेट दुरुस्तीच्या कामाकरीता एका खाजगी एजन्सीने क्रेन उभारली. त्याद्वारे दुरुस्ती
Q


परभणी, 11 जुलै (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाच्या गेट दुरुस्तीच्या कामाकरीता उभारलेले क्रेन कोसळल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला. येलदरी धरणाच्या गेट दुरुस्तीच्या कामाकरीता एका खाजगी एजन्सीने क्रेन उभारली. त्याद्वारे दुरुस्तीचे काम सुरु केले. अचानक क्रेनचा काहीसा भाग कोसळला. त्याखाली शिवकुमार नामक एक कामगार दबला. यावेळी येलदरी जलविद्युत केंद्रातील अधिकारी-कर्मचारी तात्काळ धावून गेले आणि क्रेन हटवून त्याखाली दबलेल्या त्या जखमी कामगारास बाहेर काढले. अधिकारी कर्मचार्यांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे त्या कामगाराचा जीव बचावला.

दरम्यान, जलविद्युत केंद्राच्या मागील बाजूच्या गेट दुरुस्तीच्या या कामाकरीता एका बाह्यस्त्रोत एजन्सीला काम दिल्या गेले आहे. परंतु, संबंधित एजन्सीधारक व त्यांचे अधिकारी हे या कामाकडे आजपर्यंत फिरकले नाहीत. क्रेन चालविण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या व तांत्रिक माहिती नसलेल्या अकुशल कामगारांद्वारे गेट दुरुस्तीचे काम सुरु आहे. क्रेन सुरु करत असतांना तांत्रिक बाजु न तपासल्यामुळे ती क्रेन थेट रुळावरुन घसरल्याने व धरणाच्या मागील बाजूस असलेल्या भितीवर जाऊन आदळल्याने तो कामगार क्रेनखाली अडकला. दरम्यान, मराठवाड्यातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखल्या जाणार्या येलदरी या धरणासह जलाशयाच्या परिसराकडे पाटबंधारे खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागात धरणासह वसाहत व अन्यत्र सुरक्षिततेचा गंभीर पेचप्रश्न उभा राहिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याचे गांभीर्य ओळखून या धरणाच्या गेटच्या दुरुस्तीसह अन्य तांत्रिक कामे नामवंत एजन्सीमार्फत पूर्ण करावीत व हे धरण व धरण परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊले उचलावीत, असा सुर जाणकारातून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande