
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने ८,१७५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठल्याची घोषणा करत लवकरच १० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आणि १,००० कोटी रुपयांचा स्वनिधी गाठण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या सभेत अध्यक्ष जयंत पाटील यांनी सभासदांसाठी १२.५ टक्के लाभांश जाहीर केला.
यावेळी जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक आणि उत्पन्नवाढीच्या शेतीकडे प्रोत्साहन देण्यासाठी बँकेतर्फे ‘कृषीमित्र’ योजना सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवड तसेच ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी केवळ ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असल्याचा मान रायगड बँकेला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आढावा सादर करत बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखत ९३.३७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविल्याची माहिती दिली. तसेच बँकेच्या व्यवसायात २७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सभेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, सहकारी संस्था आणि बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनाही सन्मानित करण्यात आले. या सभेला सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)