
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीतील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १७६ रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार असून, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे बालक, गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच इतर लाभार्थींना सेवा पुरविताना अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालकल्याण विभागाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यासह पुढील निवड प्रक्रिया नियमानुसार पार पडणार आहे.
या भरतीमुळे अंगणवाडी केंद्रांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होणार असून, बालक, गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड