
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने विशेष नियोजन केले आहे. त्याअंतर्गत लातूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांची पंढरपूर आषाढी वारीसाठी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच अन्य संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वारी सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वारी काळात या अधिकाऱ्यांवर पालखी मार्गावरील सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन तसेच वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचे नियोजन आणि देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यभर विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू असतानाच आषाढी वारीचे महत्त्व लक्षात घेऊन या अधिकाऱ्यांना निवडणूकविषयक कामातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे. मात्र, वारीतील सेवा कार्य पूर्ण होताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या मूळ निवडणूक कामकाजावर रुजू व्हावे, असेही शासनाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आषाढी वारीचे प्रभावी नियोजन आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात समन्वय साधण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड