
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर दोन दिवस मुक्काम असतो. या काळात पालख्यांसोबत असलेल्या बहुतांश दिंड्या पुढील पंधरा दिवसांसाठी लागणारा किराणा माल, तसेच कांदा, बटाटा आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी पुण्यातील मार्केट यार्डातून करतात. या खरेदीमुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्केट यार्डात सुमारे २ ते २.५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दिंड्यांकडून तेल, तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, मसाले आणि दैनंदिन वापरातील विविध किराणा वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. या खरेदीमुळे भुसार विभागात अवघ्या दोन दिवसांत सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांची उलाढाल होते.
तर, तरकारी विभागात कांदा, बटाटा, लसूण, हिरवी मिरची आणि इतर भाज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या विभागातही जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले की, पुण्यातून पुढे प्रवास सुरू करण्यापूर्वी बहुतांश दिंड्या पंधरा दिवस पुरेल इतका कांदा, बटाटा, लसूण, हिरवी मिरची आणि आले यांची खरेदी करतात. या वस्तू लवकर खराब होत नसल्यामुळे त्यांचा साठा करून ठेवला जातो. त्यानंतर दिंडी पुढे सरकत असताना आवश्यकतेनुसार प्रत्येक दोन दिवसांनी स्थानिक बाजारातून ताजा भाजीपाला खरेदी केला जातो.
आषाढी वारीमुळे धार्मिक वातावरणाबरोबरच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापारालाही मोठी चालना मिळत असून, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु