
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। चेन्नई–सुरत सहापदरी ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गावरील संगोगी (बु.) ते मुगळी (ता. अक्कलकोट) दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या आराखड्यात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी मुगळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यमान पीएमजीएसवाय रस्ता कायम ठेवून प्रस्तावित पुलाची रुंदी ५.५ मीटरऐवजी किमान ९ मीटर करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील कि.मी. ५४०.०८६ येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे विद्यमान रस्त्याच्या रचनेत मोठा बदल होत असून दोन्ही बाजूंना तीव्र आणि धोकादायक वळणे निर्माण होत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉली, हार्वेस्टर, बोअरवेल यंत्रसामग्री, जड मालवाहू वाहने तसेच रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन सेवांच्या वाहनांच्या वाहतुकीत गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्याच्या आराखड्यात पुलाची रुंदी केवळ ५.५ मीटर प्रस्तावित असल्याने भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता ती अपुरी ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाहतूक नियोजनाचा विचार करून पुलाची रुंदी किमान ९ मीटर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, विद्यमान पीएमजीएसवाय रस्त्याला कोणताही धक्का न लावता पुलाचे बांधकाम करावे. तसेच संबंधित विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत तांत्रिक निर्णय घ्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थ प्रतिनिधी काशिनाथ रेऊर यांनी सांगितले की, सध्याच्या पुलाच्या आराखड्यामुळे ऊस वाहतूक, बोअरवेल यंत्रसामग्री, हार्वेस्टर तसेच उंच आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून पुलाची रुंदी वाढवावी.
मुगळी परिसरातील शेती, उद्योग, दैनंदिन वाहतूक आणि आपत्कालीन सेवांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड