
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। करमाळा येथील उपकारागृहातील ५४ कैद्यांचे कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर करण्यात आले. या कैद्यांमध्ये ५१ पुरुष आणि ३ महिला कैद्यांचा समावेश असून, स्थलांतराच्या वेळी कारागृहाबाहेर कैद्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
कारागृहातील गर्दी कमी करणे आणि कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या स्थलांतरामुळे करमाळा उपकारागृहावरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कैद्यांच्या रवानगीदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी ३० पोलिस कर्मचारी आणि ३ पोलिस अधिकारी, अशा एकूण ३३ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच अतिरिक्त सुरक्षेसाठी टेंभुर्णी आणि कुर्डूवाडी येथूनही पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.
या कारवाईवेळी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, जेलर समीर पटेल, उदय गोडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील, राजेंद्र ढोरे, प्रतापसिंह शेळके, गंगाराम उघडे, हवालदार अशपाक शेख, गणेश शिंदे, आनंद पवार यांच्यासह महसूल आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, करमाळा पोलिस ठाण्याच्या आवारातील तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील चार पोलिस कोठड्यांमध्ये सध्या केवळ सात कोठडीतील कैदी शिल्लक आहेत. त्यामध्ये भोंदू मनोहर मामा याचाही समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड