
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत परस्परविरोधी लढलेले पक्ष आता सत्तेच्या एका व्यासपीठावर आल्याने शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर सत्ताधारी पक्षांचे पाठबळ मिळत असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगरपालिकेला अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रलंबित नागरी प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातून होत आहे.
सुमारे सात महिन्यांपूर्वी झालेलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि तीर्थक्षेत्र आघाडी यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपने नगरसेवकांच्या संख्येत वर्चस्व मिळविले, मात्र नगराध्यक्षपद मिळविण्यात पक्षाला यश आले नव्हते.
निवडणूक प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने नगरपालिकेसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.
त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे तीर्थक्षेत्र आघाडीतील नगरसेवक आणि भाजप यांच्यात समन्वय निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या पुढाकारामुळे स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी अधिक निधी, पायाभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पूर्णवेळ मुख्याधिकारी पदाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सत्तेतील समन्वयाचा लाभ मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड