मोहोळ नगरपरिषद इमारतीवरून वाद; पंचायत समिती-नगरपरिषद आमनेसामने
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। मोहोळ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावरून पंचायत समिती आणि नगरपरिषद प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ (जुने नवोदय महाविद्यालय) परिसरात नवीन इमार
मोहोळ नगरपरिषद इमारतीवरून वाद; पंचायत समिती-नगरपरिषद आमनेसामने


सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। मोहोळ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावरून पंचायत समिती आणि नगरपरिषद प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ (जुने नवोदय महाविद्यालय) परिसरात नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आल्याने हा वाद अधिकच चिघळला असून, शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात पंचायत समितीचे भाजप गटनेते संजीव खिलारे यांनी तीव्र भूमिका घेत, काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. गरज पडल्यास टोकाचा संघर्ष करू, असा इशारा दिला आहे.

माहितीनुसार, मोहोळचे तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर केला होता. त्यानुसार ८ जुलै रोजी नगरपरिषद प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ च्या परिसरातील सुमारे ७० झाडे जेसीबीच्या साहाय्याने हटवून त्या ठिकाणी भूमिपूजन केले. संबंधित झाडांचे जिओ-टॅगिंगही करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पंचायत समितीने या जागेच्या मालकीवर आक्षेप घेतला आहे. गटनेते संजीव खिलारे यांच्या मते, सन १८३२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा शाळेसाठी दिली होती. त्यामुळे या जागेचा मालकी हक्क जिल्हा परिषदेकडे असून, काही तांत्रिक बाबी वगळता ती जागा नगरपरिषदेच्या मालकीची ठरत नाही.

या पार्श्वभूमीवर संबंधित जागेच्या मालकीचा प्रश्न आणि नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम यावरून प्रशासन आणि पंचायत समिती यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande