
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरातील भीषण इमारत दुर्घटनेला ७० तासांहून अधिक काळ लोटला असून घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांपैकी तिघे जिवंत असल्याचे बचाव पथकाला आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आहे.
बचाव पथकाकडून अत्यंत काळजीपूर्वक ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून अडकलेल्या तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रत्येक हालचालीचे नियोजन केले जात आहे. आज रात्रीपर्यंत संपूर्ण बचाव मोहीम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही दुर्घटना तीन दिवसांपूर्वी मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घडली होती. त्यावेळी इमारतीत सुमारे २३ ते २४ कर्मचारी उपस्थित होते. दुर्घटनेनंतर पाच जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर बचाव पथकाने नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले. शोध मोहिमेदरम्यान एका व्यक्तीचा मृतदेहही हाती लागला होता.
अधिकृत माहितीनुसार, सध्या आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची नोंद असून त्यापैकी तिघांचा ठावठिकाणा लागला आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अविरत सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु