
पुणे, 11 जुलै (हिं.स.)। मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेला शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५० तासांहून अधिक कालावधी उलटला असून, आठ कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, ढिगारा हटविल्यानंतर अतिदाबामुळे कचरा पुन्हा इमारतीच्या दिशेने सरकत असल्याने बचावकार्याला मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला इमारतीत प्रवेश करणे कठीण होत असून, अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा १९९१ पासून मोशी येथील खाणी परिसरातील डेपोमध्ये टाकला जात आहे. गेल्या साडेतीन दशकांत शहराची वाढ, बांधकामांचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी, डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर तयार झाला आहे. या जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी बायोमायनिंग प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र, त्यापूर्वीच बुधवारी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत एकूण २३ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात यश आले असले, तरी आठ कामगारांचा शोध अद्याप सुरू असून बचावकार्य वेळेशी स्पर्धा करत सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु