डच गुलाब, ऑर्किड ते झेंडूपर्यंत... पालखी सजावटीसाठी फुलांचा साज
पुणे, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात फुलांनी सजलेले रथ यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पुण्यातील मुक्कामानं
gfd


पुणे, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात फुलांनी सजलेले रथ यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पुण्यातील मुक्कामानंतर पुढील प्रवासासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पालख्यांच्या सजावटीसाठी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुलबाजारातून शोभिवंत फुलांच्या शेकडो गड्ड्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर ताजी फुले दाखल होतात. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजावट, फुलांच्या पायघड्या तसेच देवपूजेसाठी लागणाऱ्या फुलांना मोठी मागणी असते. याशिवाय पालखी आणि रथांच्या सजावटीसाठी दरवर्षी सजावटकारांकडून मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली जाते.

यंदाही प्रत्येक पालखीच्या सजावटीसाठी १५ हून अधिक प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला. एका पालखीसाठी सुमारे ३५० हून अधिक डच गुलाब, ऑर्किड, कार्नेशियन, 'साँग ऑफ इंडिया' तसेच शंभर गड्ड्या साध्या गुलाबांची खरेदी करण्यात आली. याशिवाय १५० ते २०० किलो झेंडू, निशिगंध आणि पर्पल फुलांचाही आवश्यकतेनुसार वापर करण्यात आला.

खरेदी केलेली फुले विशेष वाहनांद्वारे पालखीच्या मुक्कामस्थळी पोहोचविण्यात आली. आकर्षक फुलसजावटीमुळे पालखीचे रथ अधिक देखणे दिसत असून, मार्गभर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आषाढी वारीमुळे पुण्यातील फुलबाजारातील व्यापारालाही मोठी चालना मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande