
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केवळ भाजपच्या नगरसेवकांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्व दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रभाग समितीसाठी भाजपकडून एकच उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षांकडून एकाही नगरसेवकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असून भाजपच्या सर्व उमेदवारांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.
भाजपने दहा प्रभाग समित्यांपैकी आठ ठिकाणी महिला नगरसेविकांना संधी दिली आहे. प्रभाग ‘अ’ (राजगड)साठी अर्चना करांडे, ‘ब’ (सिंहगड)साठी मंदार देशपांडे, ‘क’ (विजयदुर्ग)साठी निखिल बोऱ्हाडे, ‘ड’ (देवगिरी)साठी सविता खुळे, ‘इ’ (शिवनेरी)साठी अर्चना सस्ते, ‘फ’ (तोरणा)साठी शिवानी नरळे, ‘ग’ (पुरंदर)साठी मनीषा पवार, ‘ह’ (प्रतापगड)साठी तृप्ती कांबळे, ‘ज’ (रायगड)साठी आरती चोंधे आणि ‘ल’ (लोहगड)साठी रेखा देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या सर्व उमेदवारांच्या निवडीवर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार असून, महापालिकेतील प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु